विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी
मालेगावात सर्वाधिक 145.1 मि.मी. पाऊस

-28 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम
-हवामान विभागाचा अलर्ट जारी
अमरावती / 26 जून: दोन दिवसांपासून हळुवार सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी तिसर्या दिवशी चांगलाच वेग घेतला. विदर्भात बुधवारी रात्री सर्वदूर धो-धो पाऊस कोसळला. गुरुवारी दिवसभर पूर्व विदर्भात उघडीप दिली पण पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ कायम होता. विशेषत: वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.
बुधवारी दिवसभर शांत राहिलेल्या पावसाला सायंकाळपासून चांगलाच जोर चढला. नागपूर शहरात रात्री 10.30 ते 11.30 पर्यंत तासभर धो-धो सरी बरसल्या. गुरुवारी सकाळपर्यंत शहरात 32.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सावनेर तालुक्यात सर्वाधिक 56 मि.मी. पाऊस झाला. दिवसभर मात्र ढग शांत राहिले. पावसाची सर्वाधिक तीव्रता यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात बघायला मिळाली. वाशिममध्ये सकाळी 8.30 पर्यंत 122.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाची तीव्रता दिवसभर कायम होती. येथे दिवसा 73 मि.मी. पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव भागात विदर्भात सर्वाधिक 145.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. यवतमाळ शहरात सकाळपर्यंत 66.6 मि.मी. पाऊस झाला. दिवसासुद्धा पावसाची संततधार सुरू होती. या जिल्ह्यातील घाटंजी सर्कलमध्ये 129.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अकोला आणि वर्धा जिल्ह्यालाही गुरुवारी दिवसभर पावसाने धुम केली. सायंकाळपर्यंत अकोल्यात 69 मि.मी. आणि वर्ध्यात 54 मि.मी. पाऊस झाला. बुलढाण्यात रात्री 47 मि.मी आणि दिवसभर 18 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही पावसाची चांगली हजेरी लागली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची ही तीव्रता आणखी दोन दिवस 28 जूनपर्यंत कायम राहणार आहे.
-यशोदा नदीत अडकलेल्या तिघांची सुटका
वर्धा जिल्ह्यातील देवळीपासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या डिगडोह येथे डिगडोह ते देवळी मार्गावर गावालगतच यशोदा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू आहे. आज 26 रोजी झालेल्या दमदार पावसाने देवळी डिगडोह मार्गावरील यशोदा नदीच्या पुरात एक विद्यार्थी व दोन कामगार अडकले होते. बचाव पथकाने दोरखंडाच्या सहाय्याने सुरक्षित पद्धतीने तिघांनाही बाहेर काढले. भावेश कापसे रा. डिगडोह, प्रज्वल सावरखेडे उमेश साखरकर दोघेही रा. नागझरी अशी पुराच्या पाण्यात अडकलेल्यांची नावं आहेत




