20 वर्षे जुनी गाडीही रस्त्यावर धावणार!
दिल्लीवगळता देशभर सरकारचा निर्णय

-वाहनधारकांसाठी नवी मुभा
-ठराविक शूल्क भरावे लागणार
नवी दिल्ली/ 22 ऑगस्ट : वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करत सरकारने वाहनाच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी देशभर जुन्या वाहनांच्या वापराची मर्यादा 15 वर्षांपर्यंत होती. परंतु केंद्रीय मोटार वाहन नियम, 2025 अंतर्गत ही मर्यादा आता 20 वर्षे करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, 15 वर्षांनंतर वाहन थेट बंद करण्याऐवजी नोंदणी नूतनीकरण करून ते आणखी 5 वर्षे रस्त्यावर चालवता येईल. हा नियम दिल्ली-एनसीआर वगळता संपूर्ण देशात लागू होणार आहे.
या निर्णयाचा ग्रामीण व मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. भारतामध्ये अनेक कुटुंबे, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, आपली मोटारसायकल किंवा कार 15-20 वर्षे वापरतात. नव्या गाडीचा खर्च झेपणे कठीण असते. त्यामुळे हा निर्णय मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गासाठी मोठा आधार ठरणार आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषणाची समस्या तीव्र असल्यामुळे तिथे 10 वर्षे जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षे जुनी पेट्रोल वाहने थेट बंद करण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे. त्यामुळं राजधानी परिसराला नवीन मुभेतून वगळण्यात आले आहे.
जुनी वाहने चालवण्याची परवानगी मिळाली असली तरी वाहनधारकांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे. पॉल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र वेळोवेळी नूतनीकरण करणे, वाहनाची फिटनेस तपासणी अधिक काटेकोरपणे करून घेणे, गरज असेल तेव्हा सुरक्षा व उत्सर्जन नियमांनुसार दुरुस्ती करणे, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या नव्या नियमामुळे जुन्या गाड्या चालविण्याची परवानगी मिळाल्याने लाखो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. मात्र सरकारने जाहीर केलेले प्रदूषण व सुरक्षा नियम पाळणे आता अधिक महत्त्वाचे झाले आहे. वाहन वाचवा, पैशांची बचत करा, पण पर्यावरणाचेही रक्षण करा, हा संतुलित संदेश या निर्णयातून दिसतो.
-नोंदणी नूतनीकरणासाठी शुल्क
जून्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी वाहनमालकाला ठराविक शुल्क भरावे लागणार असून, वाहनाच्या प्रकारानुसार ही रक्कम वेगवेगळी असेल. अवैध/रद्द वाहन नूतनीकरण: 100 रुपये, मोटारसायकल 2,000 रुपये, तीनचाकी रिक्षा: 5,000 रुपये, हलकी मोटार वाहने 10,000 रुपये, आयात केलेली दुचाकी: 20,000 रुपये, आयात केलेली चारचाकी: 80,000 रुपये, इतर सर्व श्रेणीतील वाहने: 12,000 रुपये असे शूल्क निश्चित करण्यात आले आहे. नोंदणी नूतनीकरण एकदा करून घेतल्यास वाहनाला आणखी 5 वर्षे वैधता मिळेल.




