सात बेपत्ता मुलांच्या शोधासाठी शहर पोलीस सज्ज
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या कडक सूचना

* चोवीस तासात दोन मुलींची सुटका
अमरावती /22 जानेवारी : शहरात बेपत्ता झालेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात ’ऑपरेशन मुस्कान’ पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहे. गेल्या वर्षात दाखल झालेल्या 110 प्रकरणांपैकी 95 टक्के मुलांचा यशस्वी शोध घेणार्या अमरावती पोलिसांनी आता उर्वरित सात अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यात दोन मुले आणि पाच मुलींचा समावेश असून, पोलीस यंत्रणेने संवेदनशीलपणे आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले की, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच लहान मुलांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असेल. महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व ठाणेदारांचे कौतुक केले, परंतु आता गुन्हेगारी नियंत्रण आणि बेपत्ता मुलांच्या शोधावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. सन 2025 मध्ये बेपत्ता झालेल्या 23 मुलांपैकी आणि 87 मुलींपैकी बहुतांश जणांना पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप सोपवले आहे. आता उरलेल्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या विविध तुकड्या एकमेकांच्या समन्वयाने काम करत असून, वेळ पडल्यास गुन्ह्यांचा साप्ताहिक आढावा घेण्याची तयारीही आयुक्तांनी दर्शवली आहे. आगामी 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे.
अवघ्या काही तासात मुलींचा शोध -9 जानेवारीला बालगृहातून दोन 12 वर्षीय मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या मूळच्या मध्य प्रदेशातील असून शाळा सुटल्यानंतर त्या गायब झाल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसले. गाडगे नगर पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने तपासचक्रे फिरवून मुलींच्या घरापर्यंत मजल मारली आणि अवघ्या काही तासातच त्यांना सुखरूप शोधून पुन्हा परत आणले.




