शहरातील महादेव खोरीत रोकड जप्त

नागरिकांच्या सतर्कतेने मोठी कारवाई

* रोकड वाटपासाठी वकील चिन्हांकित वाहनाचा वापर

अमरावती /14 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी धनशक्तीचा वापर होत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले असून, महादेव खोरी परिसरात एका संशयास्पद वाहनातून सुमारे 2 लाख 59 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनातून ही रक्कम जप्त करण्यात आली, त्यावर वकिलाचा बोधचिन्ह असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. नाकाबंदी दरम्यान स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा प्रकार उघडकीस आला असला, तरी प्रत्यक्षात या वाहनात 15 लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचा खळबळजनक दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या धुक्यात अडकले असून, निवडणूक प्रशासनाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणावर खेळ सुरू असल्याची चर्चा अमरावतीत जोमाने सुरू होती. याच दरम्यान महादेव खोरी भागात एमएच 27 डीयु 5667 क्रमांकाचे वाहन संशयास्पद रित्या घिरट्या घालत असल्याची माहिती सतर्क नागरिकांनी प्रशासनाला दिली. या माहितीची दखल घेत महानगरपालिकेचे विभाग क्र. 3 चे निवडणूक अधिकारी नितीन बोबडे आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाट यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. अधिकार्‍यांची गाडी पाहताच संशयास्पद वाहनातील चारही व्यक्ती अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्या, ज्यामुळे संशय अधिकच बळावला आहे. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात 2 लाख 59 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम नक्की कोणाची होती आणि कोणाच्या सांगण्यावरून वाटली जाणार होती, या दृष्टीने आता पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेने निवडणूक काळात होणार्‍या पैशांच्या गैरवापराला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तपासाच्या चक्रात राजकीय धागेदोरे महादेव खोरीतील या कारवाईने शहरातील राजकीय वातावरणात मोठा भूकंप घडवला आहे. पसार झालेले चार संशयित आणि वाहनावर असलेले वकिलाचे बोधचिन्ह यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 लाखांच्या कथित रक्कमेचा आणि प्रत्यक्षात सापडलेल्या रकमेचा ताळमेळ लावण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button