मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे 30 जुलैपासून आंदोलन

अमरावती / 28 जुलै : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसंदर्भात परिमंडळ कार्यालय (प्रशासन) अमरावती यांच्याकडून सातत्याने अन्यायकारक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत संघटनेने दि. 30 जुलै 2025 पासून परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संघटनेच्या वतीने यापूर्वी 17 जुलै रोजी भव्य द्वारसभा व 21 जुलै रोजी शेकडो कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने चर्चेचे आश्वासन दिले. त्यानुसार, संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष राहुल सांभारे, परिमंडळ अध्यक्ष अरविंद बोन्द्रे व परिमंडळ सचिव रत्नदिप तायडे यांनी प्रशासनाशी चर्चेसाठी हजेरी लावली होती. चर्चेदरम्यान काही मुद्द्यांवर प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र राहुल सांभारे यांच्या बदलीचा विषय व राहुल नाखले यांच्या 250 कि.मी. लांब केलेल्या अन्यायकारक बदलीचा मुद्दा प्रशासनाकडून दुर्लक्षित केला गेला. परिणामी, वेळकाढूपणा व टाळाटाळीच्या धोरणामुळे संघटनेचा रोष शिगेला पोहोचला आहे.
याअगोदर 28 जुलै रोजी नियोजित साखळी उपोषण प्रशासनाला आणखी एक संधी देण्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने सकारात्मक पाऊल न टाकल्यामुळे आता बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आमचा लढा हा न्यायासाठी आहे. तोपर्यंत माघार नाही, असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे. सदर साखळी उपोषण 30 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता, परिमंडळ कार्यालय, अमरावती येथे सुरु होणार असून, सर्व कर्मचार्‍यांनी सामूहिक उपस्थिती लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button