49 महाविद्यालयांवरील प्रवेश बंदी उठवली
विद्यापीठाचा निर्णय, समितीची शिफारस

अमरावती / 23 जन : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील 49 महाविद्यालयांवर घातलेली विद्यार्थी प्रवेश बंदी उठविण्यात आली आहे. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने एक समिती गठित करुन चौकशी केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार विद्यापीठाने या 49 महाविद्यालयांवरील प्रवेश बंदीचा निर्णय रद्द केला आहे.
22 एप्रिल 2025 रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत विद्यापीठाअंतर्गत विना शिक्षक, विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2025-26 पासून प्रथम वर्ष प्रवेशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार विना शिक्षक, विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. परंतू, व्यवस्थापन परिषदेने गठीत केलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने ज्या महाविद्यालयांना एका शैक्षणिक सत्रापूरती प्रवेश बंदी घालण्यात आली होती, त्यामध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
शिथीलता देण्यात आलेल्या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्याwww.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून याबाबत सर्व संबंधित महाविद्यालयांनी व प्रवेशित होवू इच्छिणाया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश पूर्वी विद्यापीठाने अवैध ठरविला होता. मात्र आता निर्णय रद्द करण्यात आल्याने या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा प्रवेश विद्यापीठात ग्राह्य मानला जाणार आहे.




