दुष्काळग्रस्त भागांमध्ये 1,500 अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार
टाटा मोटर्सचा शासनासोबत करार

अमरावती/15 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला अधिक बळ देत टाटा मोटर्सने मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारांतर्गत 25 जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त भागांमध्ये 1,500 अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. हे विस्तारीकरण सहयोग-केंद्रित जल संवर्धन उपक्रमावर आधारित आहे. या उपक्रमाने आधीच वर्ष 2025 मधील उन्हाळ्यापासून 1,450 हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन केले आहे, ज्यामुळे 3,000 कोटी लिटरहून अधिक जल साठवण क्षमता निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील जवळपास 7 लाख व्यक्तींना या क्षमतेचा लाभ झाला आहे.सार्वजनिक-खाजगी-समुदाय संचालित जल संवर्धन उपक्रमाने महाराष्ट्रातील पाणीटंचाई असलेल्या काही भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध करून दिले आहे, भूजल पातळी वाढवली आहे आणि सिंचन सुविधा सुधारली आहे. पुढील टप्प्यामध्ये हा उपक्रम नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभाग या जिल्ह्यांमध्ये विस्तार साधणार आहे. या उपक्रमाच्या विस्तारीकरणाबाबत मत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेमधून विकेंद्रीकृत व समुदाय-केंद्रित उपाययोजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन जल सुरक्षा निर्माण करण्याप्रती महाराष्ट्राची कटिबद्धता दिसून येते. टाटा मोटर्स अनेक वर्षांपासून राज्यासाठी बहुमूल्य सहयोगी आहे, तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसह प्रामाणिक जबाबदार कंपनी म्हणून अर्थपूर्ण उपक्रम राबवत आहे. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही भूजल पातळी वाढवण्याप्रती आणि कृषी स्थिरता आणण्याप्रती आमचे प्रयत्न वाढवण्यासह दृढ केले आहेत.




