विजेची तार आणि शेतातील केबल चोरणारी टोळी जेरबंद
बारा जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

-7 गुन्ह्यांची कबुली
-ग्रामीण भागात घातला होता हैदोस
अमरावती / 25 जून: महावितरणचे लक्षावधी रुपये किंमतीेचे अॅल्युमिनिअमचे तार आणि शेतातील मोटरपंपाची केबल चोरुन नेत अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुमाकुळ घालणार्या चोरट्यांच्या टोळीतील दोन मुख्य सूत्रधारांसह एकुण 12 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेेने ही कारवाई केली आहे. आरोपींमध्ये दहा चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणार्या दोन भंगार व्यापार्यांचा समावेश आहे. या टोळीने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडवून आणलेल्या तार व केबल चोरीच्या सात घटनांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने दर्यापूर तालुक्यात महावितरणची वीज वाहून नेणार्या तारा तसेच शेतकर्यांच्या शेतातील केबल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातल्याने शेतकरी हैराण झाले होते. दर्यापूर, खल्लार, खोलापूर पोलिस ठाण्यात यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशातच दर्यापूर तालुक्यता गायवाडी ते माहुली धांडे मार्गावर गायवाडा ते दर्यापूरच्या पृथ्वीराज नगर दरम्यान 12.5 किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेला विजेच्या खांबावरील 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा 55 एमएमचा अॅल्युमिनिअमचा तार व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दर्यापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तार टाकण्याचे काम करणार्या पॉलीकॅप इंडिया लि. कंपनीचे अधिकारी नितीन सुधाकर थोर यांनी ही तक्रार दाखल केली होती.
सोबतच खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडा आणि सांगवा येथील सुभाष देविदास सोळंके यांच्यासह 14 शेतकर्यांनी लक्षावधी रुपये किंमतीचा बोअरवेलमधील 1310 फुट केबल चोरुन नेण्यात आला असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी संबंधित पोलिस ठाण्यांना कसून चौकशीचे आदेश दिले सोबतच या प्रकरणांचा समांतर तपास ग्रामीण गुन्हे शाखेलाही सोपविला होता. दरम्यान गुन्हे शाखेच्या दर्यापूर उपविभागातील उपनिरिक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला या गुन्ह्यांबाबत गुप्त सूत्रांकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली होती. या घटनांमध्ये दर्यापूर येथील रहिवासी असलेले कुख्यात चोरटे दिनेश चव्हाण आणि गोलु उर्फ सागर गुन्हाणे यांचा हात असून दहा साथीदारांसह टोळी तयार करुन त्यांनी हे गुन्हे केले असल्याचे गुन्हे शाखेला समजले.
त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेउन विचारपूस केली, तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका मिळताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आणि टोळीतील आपल्या साथीदारांची नावेही सांगितली. पोलिसांनी दिनेश चव्हाण आणि सागर गुल्हाणेच्या दहा साथीदारांना अटक केली आहे. त्यांनी दर्यापूर, खल्लार आणि खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण सात तार व केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. चोरीचा माल दर्यापूरच्या गजानन खरुले आणि अमरावतीच्या वसीम शेख बिस्मील्ला या भंगार विक्रेत्यांना विकत असल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
-अटक झालेले टोळीतील आरोपी
दिनेश काशिनाथ चव्हाण (29, रा. दीक्षाभूमी नगर, दर्यापूर) आणि सागर उर्फ गोलू किशोर गुल्हाने (27, रा. मोमीनपुरा, खोल्हापूरी गेट, दर्यापूर) हे या टोळीचे म्होरके आहेत. वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेउन त्यांनी दोन टोळ्या तयार केल्या होत्या. त्यांच्या सोबत ते तार व केबल चोरीचे गुन्हे घडवून आणायचे. अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींमध्ये अक्षय रघुनाथ पवार (30, रा. हिवरा बू. ता. नांदगाव खंडेश्वर), दर्शन दिवाकर गवई (24, रा. भीम नगर दर्यापूर), राजेश रामराव चव्हाण (32, रा. पुनर्वसन एकविरा शाळेजवळ दर्यापूर), वैभव दिलीप नेवारे (24, रा. शौनीपुरा महाराणा प्रताप शाळेजवळ, दर्यापूर), संतोष सहदेव सोळंके (35, रा. दीक्षाभूमी नगर, दर्यापूर), हरीश ज्ञानदेव हिंगणकर (39, रा. महाराणा प्रताप शाळेजवळ, दर्यापूर), सेषन नागोराव सोळंके (24, रा. दीक्षाभूमी नगर दर्यापूर), गजानन हरिराम खरुले (38, रा. आठवडी बाजार, बनोसा, दर्यापूर), शेख वसीम शेख बिस्मिल्ला (42, रा. अन्सार नगर, अमरावती) आणि विशाल छोटू चव्हाण (30, रा. हिवरा) यांचा समावेश आहे.




