मोबाइल क्रमांकांचा गैरवापर करून मतदार नावं वगळली

यादीत घोटाळा, राहुल गांधींचा गंभीर आरोप

-काँग्रेसच्या मतांवर घाव, पुरावे सादर
-निवडणूक आयोगावर थेट निशाणा
मुंबई / 18 सप्टेंबर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय निवडणूक प्रक्रियेतील गंभीर घोटाळ्याचा आरोप करत निवडणूक आयोगावरच थेट बोट ठेवले. त्यांनी दावा केला की, कर्नाटकमधील आलंद मतदारसंघामध्ये 6,018 मतदारांची नावं खोट्या अर्जांच्या आधारे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे अर्ज संबंधित मतदारांच्या नावानेच, पण वेगवेगळ्या राज्यांतील मोबाईल क्रमांक वापरून, स्वयंचलित सॉफ्टवेअरच्या मदतीने भरल्याचा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी थेट उदाहरणं समोर मांडली. गोदाबाई नावाच्या महिलेचं नाव वगळण्यासाठी तिच्याच नावाने अर्ज झाल्याचं त्यांनी दाखवलं. इतकंच नव्हे तर सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावाने अवघ्या 14 मिनिटांत 12 अर्ज भरले गेल्याचं उघड करण्यात आलं, तर बबिता चौधरींचं नाव वगळण्यासाठीही अर्ज झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र या दोघांनीही स्वत: अर्ज केल्याचं नाकारत व्यासपीठावर मोकळेपणाने सांगितलं. विशेष म्हणजे, काही अर्ज पहाटे 4 वाजता भरले गेले होते. राहुल गांधी यांनी यावर प्रश्न उभा करत विचारलं की, एखादा अर्ज स्वत: भरून बघा, किती वेळ लागतो. मग 36 सेकंदात दोन अर्ज कसे भरले गेले?
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण कट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना लक्ष्य करून रचण्यात आला. आलंदमधील ज्याठिकाणी काँग्रेसला विजय मिळण्याची शक्यता जास्त होती, त्या मतदान केंद्रांमधून अशा पद्धतीने मतदार नावं वगळण्यात आल्याचं त्यांनी जोरदारपणे सांगितलं. त्यांच्या माहितीनुसार, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या 10 पैकी 8 मतदान केंद्रांमध्येच सर्वाधिक मतदार नावं वगळली गेली.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत असेही स्पष्ट केलं की, कर्नाटक सीआयडीने मागील 18 महिन्यांत केंद्रीय निवडणूक आयोगाला 18 पत्रं लिहिली आहेत, मात्र आवश्यक माहिती मिळाली नाही. अर्जांचे आयपी अड्रेस, वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक आणि ओटीपी कुठे गेले, ही माहिती लपवून ठेवण्यात आली आहे, असा त्यांचा आरोप होता. यावरून त्यांनी थेट दावा केला की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच या घोटाळ्याला झाकून बसले आहेत. लोकशाहीशी खेळणार्‍यांना तेच संरक्षण देत आहेत. पत्रकार परिषद संपवताना त्यांनी देशवासीयांसमोर भावनिक आवाहन केलं, माझं देशावर आणि लोकशाहीवर अतूट प्रेम आहे. मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. आता निष्कर्ष काढणं तुमच्या हातात आहे. मी जनतेसमोर पुरावे ठेवत आहे, असे ते म्हणाले.

-ऑनलाइन मते हटवता येत नाहीत : आयोग
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन पद्धतीने हटवता येत नाही, असा दावा करत राहुल गांधी यांचे आरोप आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे आयोगाचे आयोगाने म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा दाखल केल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button