विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला

छगन भुजबळांचा विखे पाटलांवर हल्लाबोल

* शेरो शायरीतून बिडच्या एल्गार सभेत जोरदार फटकेबाजी
* मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका

मुंबई/17 ऑक्टोबर – मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे आणि तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. यावेळी बोलताना भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. विखे पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात आणि महाराष्ट्रभर विखार पसरवून जातात, असे भुजबळ म्हणाले. भाजपच्या लोकांना ते सांगू इच्छितात की, आपल्या लोकांना आवरा.

भुजबळ म्हणाले की, अनेक लोक म्हणतात की त्यांना बोलायला दिलं नाही किंवा त्यांचा फोटो बॅनरवर लावला नाही; मात्र, अधिकाराच्या लढाईत जे जमीर जिंदा आहेत, ते स्वतः उपस्थित राहतात. त्यांनी शेरो-शायरीतून सांगितले की, आपल्या हक्कावर गदा आल्यावर टक्कर देणे गरजेचे आहे. काही लोकांनी मेळाव्यात घुसखोरी करण्याची शक्यता आहे, तसेच सुतळी बॉम्बसारखे गोष्टी घेऊन येण्याची माहिती आहे; अशा घटनांमध्ये पोलिसांच्या हस्तक्षेपाने शांतता राखावी.

भुजबळ म्हणाले की, राज्यात 54 टक्के ओबीसी, 13 टक्के दलीत, 7 टक्के आदिवासी, 3 टक्के ब्राह्मण आणि उरलेल्या नागरिकांचा समावेश मुस्लिम व मराठा समाजात आहे. त्यामुळे दुहेरी लढाई लढावी लागणार आहे – एक न्यायालयात आणि दुसरी रस्त्यावर. त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या दावणीला बांधून काम करत नाहीत; इथं फक्त ओबीसीसाठी लढा दिला जातो. जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करावे. मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती आहेत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून सर्वोच्च न्यायालयानेही मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही असे सांगितले आहे. भाजपच्या नेत्यांना भुजबळ यांनी इशारा दिला की, ओबीसीच्या ताकतीवर त्यांना 145 आमदार मिळाले आहेत, त्यामुळे यावर मार्ग काढावा.

* अंगावर आले तर शिंगावर घ्या, धनंजय मुंडे

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या हक्काचं आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. यापुढे ओबीसी आरक्षणाला लढा हा देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार. येणार्‍या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. बीडमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली.

* वडेट्टीवार यांच्यावर निशाणा

भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका केली. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे. तुम्ही सांगितलं होतं तुमच्याबरोबर आहे. मग तुम्ही का नाही आलात ? असा सवाल भुजबळांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button