विजेचा झटका लागून शेतमजूराचा मृत्यु
बैलही ठार, एक मजूर गंभीर

-महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी
चांदुर रेल्वे / 24 जुलै : शेतात डवरणीसाठी जात असलेल्या एका शेतमजूराचा रस्त्यात पडलेल्या वीजेच्या जिवंत तारेचा स्पर्ष होवून दुर्दैवी मृत्यु झाला तर अन्य एक शेतमजूर गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेत विजेच्या झटक्याने एक बैलही ठार झाला आहे. या घटनेसाठी महावितरणचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी पोहोचून महावितरणच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
अशोक सोनोजी शेंडे (वय 40) असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतमजूराचे नाव आहे. ते निंभा गावातील रहिवासी होते. आज गुरुवारी (24 जुलै) सकाळी डवरणीच्या कामासाठी अशोक शेंडे आणि त्यांचा सहकारी बैलासह शिवारातील शेतात निघाले होते. वाटेत एका ठिकाणी महावितरणची विजेची जिवंत तार तुटून रस्त्याच्या मधोमध पडली होती. त्यावर अशोक शेंडे आणि त्यांच्या सहकार्याचे लक्ष गेले नाही. त्यांचा या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा जबरदस्त झटका बसला. यात अशोक शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. त्यांचा बैलही जागीच ठार झाला. तर सहकारी गंभीररीत्या जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.
घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पंचनामा केला. मृत अशोक शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे गावकर्यांमधून महावितरणप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले जात आहेत. गावकर्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणच्या कर्मचार्यांना कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले, महावितरण कंपनी मेंटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांची फक्त बिले काढत आहे. पण प्रत्यक्षात शेतकरी आणि मजुरांच्या जीवांशी खेळ खेळला जात आहे. कंपनी फक्त ठेकेदारांना श्रीमंत आणि गब्बर करण्याच्या मागे आहे. यामागे मोठ्या प्रमाणात कमिशनचा धंदा सुरू आहे. या निष्काळजीपणामुळे निर्दोष लोकांचे जीव गेले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न जगताप यांनी विचारला. त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली.




