विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
राज्यात शुक्रवारपर्यंत पाउस

-अमरावतीत 7 व 8 जुलैला मुसळधार
पुणे / 6 जुलै: राज्यातील बहुतांश भागात रविवारी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील सर्वच घाटमाथ्यांवर अतिवृष्टी झाली. सोमवारीही घाटमाथ्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. जुलैच्या दुसर्या आठवड्यात मात्र राज्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेला पाऊस राज्यात शुक्रवार (दि.11 जुलै) पर्यंत राहणार आहे. त्यानंतर पाऊस एकदम कमी होत आहे. त्यामुळे जुलैच्या दुसर्या आठवड्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात 7 व 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाउस पडण्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेश अन् गुजरात राज्यात पाऊस वाढला तरच राज्यातील पावसाचे अंदाज बदलतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोकण भागात 7 ते 12 जुलै, विदर्भात 7 व 8 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज आहे. विदर्भात 9 ते 11 जुलैदरम्यान मुसळधार पाउस बरसेल. मध्य महाराष्ट्रात 7 व 8 जुलैला मुसळधार, 9 ते 11 जुलै दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात 7 व 8 जुलै रोजी मुसळधार तर 9 ते 11 जुलै दरम्यान हलका पाऊस पडणार आहे.
-असे आहेत अलर्ट (कंसात जुलैतील तारखा)
ऑरेंज अलर्ट : (मुसळधार) : रायगड (7, 9), रत्नागिरी (7 ते 9), पुणे घाट (7, 9), नाशिक घाट (9), अमरावती (7, 8), भंडारा (7), चंद्रपूर (7, 8), वर्धा (7), गोंदिया (8), नागपूर (7, 8). यलो अलर्ट : (मध्यम) : पालघर, ठाणे, मुंंबई (7 ते 9), रायगड (8,10), रत्नागिरी (10), सिंधुदुर्ग (7 ते 9), धुळे (7 ते 9), जळगाव (7, 8), नाशिक (8), पुणे घाट (8, 10), कोल्हापूर घाट (7 ते 9), छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी (7, 8), बीड (8), हिंगोली, नांदेड, अकोला (7, 8), अमरावती (9), भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ (7, 9).




