झाडाची फांदी दुचाकीवर पडली, पती-पत्नी जखमी
दुचाकीवरुन जाताना अपघात

-इर्विन शवगृहाजवळील घटना
अमरावती / 24 जून: दुचाकीवरुन जात असलेल्या पती-पत्नीच्या अंगावर झाडाची फांदी कोसळल्याने दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. ही दुर्घटना आज मंगळवारी, दुपारी रेल्वे स्टेशन ते इर्विन मार्गावर शवागृहासमोर घडली. सुभाष खंडारे आणि शकुंतला खंडारे अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. शकुंतला खंडारे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
प्राप्त माहितीनुसर सुभाष खंडारे पत्नी शकुंतला यांच्यासह आज दुपारी रेल्वे स्टेशन ते इर्विन मार्गाने दुचाकीवरुन जात होते. यावेळी जोराचा वारा वाहत होता. इर्विन शवागृहानजीक गजानन महाराज मंदिरासमोर अचानक एका झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर येवून कोसळली. त्यामुळे दोघेही खाली जमीनीवर पडले आणि फांदीखाली दबले गेले. बराच वेळ दोघेही या फांदीखाली अडकून होते. यावेळी आजूबाजूला हजर असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर खंडारे दांपत्याला या फांदीखालून काढण्यात आले.
या घटनेत शकुंतला खंडारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुभाष खंडारे हे सुद्धा जखमी झाले. शकुंतला खंडारे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुभाष खंडारे यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. ज्या झाडाची फांदी आमच्या अंगावर पडली त्या झाडाची अर्धवट छटाई रेल्वेने केली होती. रस्त्याच्या बाजूच्या फांद्या तशाच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे असंतुलीत असलेल्या या झाडाची फांदी जोराच्या हवेमुळे तुटली आणि आमच्या अंगावर पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.




