हातात देशी कट्टा घेउन रस्त्यात मस्ती, तिघांना अटक
वेलकम पॉइंटवरील प्रकार

-एक जिवंत काडतूस जप्त
अमरावती/ 27 जून : भररस्त्यात हाता देशी कट्ट्ा घेउन आपसातच मस्ती करुन दहशत माजवत असलेल्या तिघाजणांना गाडगेनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. वेलकम पॉइंट या वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही जप्त केले आहे.
मयुर उर्फ माया प्रकाश चव्हाण (20), गजेंद्र सुधाकर पवार (20) आणि राज गोकुल सोळंके (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही शहरातील विलास नगर परिसरातील रहिवासी असून ते विविध गंभीर गुन्ह्यांत आरोपी आहेत. गाडगे नगर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना हे तिघे वेलकम पॉइंट परिसरात हातातील देशी कट्टा एकमेकांवर ताणून आपसात मस्ती करित असून त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असल्याची माहिती या पथकाला मिळाली. तेव्हा पोलिस पथकाने तात्काळ वेलकम पॉइंट येथे जावून शिताफीने तिन्ही आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून 31 हजार रुपये किंमतीचा देशी कट्टा जप्त केला. अंगझडतीत एका जणाकडे 9 एमएम जिवंत काडतूस आढळून आले. तेसुद्धा पोलिसांनी जप्त केले. तिघांवरही गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांच्या निर्देशावरुन सहाय्यक निरिक्षक मनोजकुमार मानकर, हेकॉ निलेश जुनघरे, एएसआय गजानन बरडे, शिपाई सुशांत प्रधान, मतीन शेख, सिद्धार्थ श्रृंगारे यांच्या पथकाने केली.




