यंदा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही

मुंबई – राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा आनंद यंदा मिळणार नाही. आर्थिक अडचणींमुळे ही योजना थांबवण्यात आली असून, ती कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती, ज्याचा उद्देश गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदात साजरे करता यावेत असा होता. मात्र, आर्थिक संकटामुळे या दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे. पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, गणपती आणि दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला होता, पण वित्त विभागाने ते शक्य नसल्याचं सांगितलं. एका आनंदाचा शिध्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च येतो.




