मुंबई महापालिकेत महापौर पदावरुन वाद नाही
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई /18 जानेवारी -महापालिकेचे निकाल लागल्यानंतर राजकारण आणखी तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर अचानक 29 नगरसेवक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. मुंबईचे महापौरपद अडीच वर्षे मिळावे, तसेच महापालिकेतील महत्त्वाच्या समित्या मिळाव्यात म्हणून भाजपावर हा दबाव निर्माण केला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहेत. याचबद्दल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आले.
महापौरपदाबद्दलचा निर्णय कसा होणार, याविषयी त्यांनी भाष्य केले. 89 जागा जिंकलेला भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेसेनेची मदत लागणार आहे. दोन्ही पक्ष युतीत लढले. भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या, तर शिंदेसेनेचे 29 उमेदवारच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कमी नगरसेवक असले, तरी शिंदेंकडून भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आमचे संसदीय मंडळ आहे. तिथे जी काही मागणी आहे, ती येईल. माझ्याकडे तरी काही मागणी आलेली नाही. आमच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हेही आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जर मागणी असेल (महापौरपदाची) तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील. याबद्दल जी काही चर्चा करायची आहे, ती माध्यमांमध्ये होत नाही. पत्रकारांशी होत नसते, ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच होईल, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल अधिक बोलणे टाळले.




