…तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल

मुंबई/5 जानेवारी – राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले तर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडेल, असं राजकीय विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यभरात महानगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील विविध भागात पक्षातील उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान राज्याच्या राजकारणावर राजू खरे यांनी मोठं भाष्य केलंय. राजू खरेंच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत. यात महायुतीतील घटकपक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वच काही आलबेल आहे, असं वातावरण नाही. महायुतीमधील नेतेच एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. याचदरम्यान मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमात फडणवीस सरकार पडेल, असं वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदेंकडे साठी आणि अजित पवारांकडे 42 आमदार आहेत आणि इतर अपक्ष सोबत आले. त्यानंतर हे सगळे सरकारमधून बाहेर पडले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडले ना.., असे म्हणत आमदार खरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. राजू खरे यांच्या वक्तव्यावर महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.




