अमरावती-पुणे मार्गासह 20 महत्त्वाच्या गाड्यांची चाके थांबली

रेल्वे प्रवाशांना ब्लॉकचा मोठा फटका

* दौंड ते काष्टी दरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम
* प्रवाशांची मोठी गैरसोय रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

पुणे/6 जानेवारी : मध्य रेल्वेच्या दौंड ते मनमाड या रेल्वे मार्गावरील काष्टी स्थानकादरम्यान सध्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा ’मेगाब्लॉक’ घेतल्याने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार्‍या रेल्वे सेवेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
या कामामुळे अमरावती ते पुणे एक्सप्रेस, नागपूर ते पुणे गरीब रथ आणि पुणे ते सोलापूर यांसारख्या 20 पेक्षा अधिक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषतः 23 ते 25 जानेवारी या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होणार असून प्रवाशांना आपले प्रवासाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार आहे. 4 जानेवारीपासून सुरू झालेली ही स्थिती 25 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने कायम राहणार असून यामुळे हजारो प्रवाशांचे आरक्षण धोक्यात आले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी काष्टी स्थानकाजवळ हे काम केले जात आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका विदर्भातून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांना बसला आहे. गाडी क्रमांक 11025 पुणे – अमरावती एक्सप्रेस 24 आणि 25 जानेवारीला बंद राहणार असून, परतीच्या प्रवासातील 11026 अमरावती – पुणे एक्सप्रेस 23 ते 25 जानेवारी दरम्यान धावणार नाही. याव्यतिरिक्त 12119/20 अमरावती – पुणे आणि अजनी – पुणे एक्सप्रेस देखील 24 व 25 जानेवारीला रद्द करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी लोकप्रिय ’गरीब रथ’ एक्सप्रेस (12114) 25 जानेवारी रोजी रद्द असेल. तसेच पुणे ते अजनी दरम्यानची ’हमसफर’ एक्सप्रेस (22139/40) देखील 24 आणि 25 जानेवारीला रुळावर दिसणार नाही. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना आता खाजगी वाहतुकीचा किंवा पर्यायी रेल्वे मार्गांचा विचार करावा लागत आहे. 14 ते 25 जानेवारी रोजी पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस (12169/70), पुणे-सोलापूर एक्सप्रेस (12177/78), कलबुर्गी-दौंड विशेष गाडी (01422/25), निजामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस (11413/14), 24 आणि 25 जानेवारी – पुणे-अमरावती (11025), अमरावती-पुणे (12119).

संबंधित बातम्या

Back to top button