महायुतीत महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!
100 पदाधिकार्यांची वर्णी लागणार

मुंबई / 23 जुलै : स्थानिक स्वराज संस्थेच्या आधीच महायुती आपल्या पदाधिकारी आणि आमदारांना मोठं गिफ्ट देणार आहे. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपासून रखडलेला महामंडळ जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीमधील आमदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना महामंडळाची ’लॉटरी’ लागणार आहे. महायुतीची महामंडळ वाटपाबाबत नुकतीच बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीत महामंडळ वाटपाच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार महामंडळ वाटपामध्ये सर्वात मोठा वाटा भाजपला मिळणार आहे.
महामंडळच्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 44 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 33 तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 जागा मिळणार आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी हुकलेल्या आमदारांची नाराजी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन दूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. महामंडळाच्या जागा वाटपामध्ये म्हाडा आणि सिडकोसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना या दोघांनी दावा केला आहे. ही दोन्ही महामंडळे आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे आग्रही आहेत. तर, भाजपची वाढलेली ताकद पाहता ही दोन्ही महामंडळे आपल्याकडे असली पाहिजे, असे युक्तीवाद भाजप नेत्यांकडून केला जातोय.




