काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची घोषणा

* उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
मुंबई/20 डिसेंबर -मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेची निवडणूक साधारण सात वर्षांपासून रखडलेली आहे.
मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे शिवसेनेकडून (ठाकरे) वारंवार सांगितले जात होते. मात्र ठाकरे गटाची राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील मनसेसोबत वाढलेली जवळीकीनंतर काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा सुरु केली. अखेर आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या संबंधीची घोषणा केली आहे. यावेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडला. दुबार मतदार आणि व्होटचोरीचा मुद्दा घेऊन काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष तसेच त्यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मनसेनेही या विरोधात आवाज उठवला. तेव्हापासून महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसे हा नवा साथीदार सहभागी होणार अशी चर्चा होती. मात्र आज (शनिवार) काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे की, मुंबई काँग्रेस कमिटीने ठरवले आहे की, मुंबई महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढू. शिवसेना उद्धव ठाकरे, भाजप यांच्याविरोधात आम्ही लढू, मुंबईकरांनी एकदा आम्हाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ही कार्यकर्त्यांची निवडणूक – वर्षा गायकवाड -काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. यापूर्वी 2017 मध्ये आणि त्याआधीही आम्ही स्वबळावर लढलो होतो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर लढले पाहिजे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.




