मराठीचा आवाज बुलंद करित ठाकरे बंधूंची एकत्रित वज्रमूठ
ग्रँट एंट्रिसह एकमेकांना आलिंगन अन उपस्थितांचा जल्लोश

-दोन दशकानंतर दोन्ही कुटुंब एकाच व्यासपीठावर
-मराठी जनांनी अनूभवला सुखाचा क्षण
-राजकिय मनोमीलनाचे दिले स्पष्ट संकेत
मुंबई / 5 जुलै: उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी आज हिदी सक्तीविरोधातील विजयोत्सव मेळाव्या मेळाव्याच्या माध्यमातून वरळी डोम येथे मराठीचा आवाज बुलंद करित एकत्रित वज्रमुळ बांधली. तब्बल वीस वर्षानंतर हे दोन भाउ एकत्र आले. दोघांचेही संपूर्ण कुटुंब एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरेंचे दोन दशकांपूर्वी दुरावलेले हे दोन शिलेदार आज एकत्र आल्याचा सुखद क्षण मराठी जनांनी याची देही याची डोळा अनूभवला. मेळाव्याला संबोधित करताना मराठीच्या मुद्यावर एकत्रित आल्यानंतर आपल्या भाषणातून भविष्यात राजकिय मनोमीलनाचेही संकेत दिलेत. दोन्ही बंधूंनी व्यासपीठावर येताच एकमेकांना आलिंगन दिले. तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोश केला.
भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली. प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निशाण्यावर होते. त्यांचा महाराष्ट्रद्रोही असा उल्लेख करुन दिल्लीतील नेत्यांच्या दावणीला महाराष्ट्राला त्यांना बांधू देणार नाही, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करायची तयारी, ठाकरे बंधूंनी यावेळी दर्शविली. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या शिवसेना उबाठा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचा दोन दशकानंतर प्रत्यक्षात आलेला हा क्षण भावनिकदृष्ट्या भारावणारा ठरला. शिवसेनेच्या जून्या अनेक नेत्यांनी या क्षणाचे साक्षीदार होतांना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आणि भविष्यात दोघांनी एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, नेत्या राखी जाधव, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी व अन्य नेते उपस्थित होते. पण या कार्यक्रमामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाल्याने सर्व उपस्थितांनी याची देही, याची डोळा हा क्षण अनुभवला आहे. पण यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर आल्याची.
…हो, तर मराठीसाठी आम्ही गुंडगिरी करायला तयार
-उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
-फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल
त्रिभाषा सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यामध्ये राज्यातील कानाकोर्यातून मराठी सैनिक आले होते. सुरूवातीला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला संबोधित करत थेट युतीचे संकेत दिले आहेत. ’एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी’ असे विधान करताच उपस्थितांनी ’जय महाराष्ट्र’ अशी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, आज आमच्या भाषणांपेक्षा दोघांचं एकत्र दिसणं गरजेचं. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केलाय. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. भाजप ही खरंतर अफवांची फॅक्टरी आहे. मागील काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलंय असं उठवलं. खरंतर हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे, तुमच्याहून जास्त कडवट कट्टर आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर, आम्ही गुंड आहोत.
मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती होती आणि याचा मला अभिमान आहे. यानंतर काहीजण कोर्टात गेले, ही गुंडगिरी नाही? तो भेडिया का कोण? ही त्यांची पिलावळ आहेत. ते म्हणतात शिवसेनेनं आजवर काय केलं? मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेलं. मराठी माणूस जर मुंबईबाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही मुंबई अन् महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचं काय? उद्योग, व्यवसाय पळवले त्याचं काय? आपली ताकद ही एकजुटीची असायला हवी. संकट आले की आपण सगळे एकत्र येतो. संकट गेल्यावर आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाही.
वृत्तपत्रात बातमी वाचली की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद झालं आहे. नव्यानं नोंदणी होणार नाही, आता बसा बोंबलत. त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे, संपूर्ण भारतात कर्जबाजारी शेतकर्यांची संख्या जास्त महाराष्ट्रात आहे. एक गद्दार काल म्हणाला, जय गुजरात.. किती लाचारी करायची? पुष्पामध्ये नायक म्हणतो, झुकेगा नही साला, तसे हे गद्दार म्हणातात, उठेगा नही साला. आता त्यांच्यात उठण्यासारखं आहेच काय?ख अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना हिणवलं.

…तर त्यांनी महाराष्ट्र, मुंबईला हात घालून दाखवावा
-राज ठाकरे यांचा खणखणीत इशारा
-सरकारला खडसावले
महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला खडसावून सांगितले. थेट ’कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा.’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं. ते आज देवेंद्र फडणवीसांना जमलं. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही. असे राज ठाकरे म्हणाले. तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. असेही त्यांनी ठणकावले.
हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले. कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळाले. त्याशिवाय त्यांनी माघार नाही घेतली. हिंदीभाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. ते म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले? यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे.असा सल्लाही राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना दिला.





