उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
आरोपी युसूफ खानचा युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय

मुंबई । 21 जानेवारी : अमरावतीचे औषध व्यापारी उमेश कोल्हे यांच्या 2022 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. ही हत्या केवळ वैयक्तिक सूड घेण्याचा प्रकार नसून, समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली कृती होती, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याच कारणास्तव न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी पशुवैद्यक डॉ. युसूफ खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने नमूद केले की, असे गुन्हे समाजाचा आत्मा आणि नैतिक जाणीव हादरवून टाकतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि लोक दहशतीच्या छायेत जगण्यास मजबूर होतात. डॉ. युसूफ खानने न्यायालयात दावा केला होता की, त्याचा हत्येत थेट सहभाग नव्हता; त्याने फक्त इतर डॉक्टरांना कोल्हे यांच्या दुकानातून औषधे न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे खानविरुद्धचे आरोप प्रथमदर्शनी सत्य वाटतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी रात्री घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या समर्थनाची पोस्ट कोल्हे यांनी एका व्हॉट्सप ग्रुपवर शेअर केली होती. त्या ग्रुपमधील सदस्य असलेल्या डॉ. युसूफ खानने या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून तो इतरत्र पसरवला, ज्यातून ही हत्या घडवून आणली गेली.
न्यायालयाचे कडक ताशेरे
आपल्या धर्माच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जनतेत दहशत पसरवण्यासाठी आरोपींनी एका दहशतवादी टोळीची निर्मिती केल्याचे रेकॉर्डवरील पुराव्यांवरून दिसून येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हा गुन्हा केवळ गंभीर नसून घृणास्पद आहे. समाजाच्या सुरक्षिततेवर आणि मानसिकतेवर होणारा विपरित परिणाम पाहता, आरोपीला जामीन देणे न्यायसंगत ठरणार नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला.




