अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानला चिखलदरा येथील 3 एकर जमीन देण्यास मान्यता
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई /31 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (31 डिसेंबर) 2025 या वर्षाची राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आधी 2 किंवा त्याहून अधिक निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र आजच्या बैठकीत केवळ एकच निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने अमरावतीच्या अंबादेवी संस्थानबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. नववर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील ‘श्री अंबादेवी संस्थान, अमरावती’ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुमारे 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता दिली आहे. अंबादेवी संस्थानास ही जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग-2 म्हणून मिळणार आहे. विशेष म्हणजे सदर जमीन अंबादेवी संस्थानास धार्मिक उपक्रमासाठी वापरता येणार आहे.शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिलेली जमीन ताब्यात घेतली दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थेकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या संस्थेने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. त्यामुळे शासनाने 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिलेली जमीन ताब्यात घेऊन सुमारे 3 एकर 8 आर जमीन श्री अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून दिली आहे. कारण शासनाने 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन दिली होती. मात्र गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या जमिनीवर काही काम केले नाही. त्यामुळे वापराविना पडून असलेली जमीन ताब्यात घेतली आहे.




