बाळासाहेब-अटलजींनी केलेली युती अटल राहणार
चव्हाणांच्या विधानावर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

मुंबई /28 नोव्हेंबर – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीचा वाद एवढा विकोपाला गेला आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मला फक्त 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे निर्वाणीचे वक्तव्य गुरुवारी केले. त्यावरुन या निवडणुकीनंतर महायुती तुटणार का, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी चव्हाणांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्गामध्ये भाजप विरुद्ध शिदेंची शिवसेना असा जोरदार सामना रंगला आहे. आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकार्यांच्या घरावर धाड टाकत रोख 25 लाख रुपये निवडणूक अधिकार्यांना जप्त करायला लावले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नसल्यामुळे ते संतप्त आहेत. निलेश आणि नितेश राणे हे दोन्ही बंधू वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांच्यामधून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती या निवडणुकीत निर्माण झाली आहे. त्यातूनच रविंद्र चव्हाणांनी आम्हाला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे 2 डिसेंबरनंतर युतीचे काय होणार, अशी चर्चा रंगली आहे.
भाजप नेत्यांकडून सारवासारव-भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक म्हणाले की, रविंद्र चव्हाण चुकून बोलले असणार. त्यांचे बोलणे फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजपचा झेंडा फडकला म्हणजे फार काही मिळाले असे होत नाही. खुर्ची मिळाल्यानंतर काम करणं महत्त्वाचं आहे, अशी सारवासारव गणेश नाईक यांनी केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही असाच सूर आळवला आहे. ते म्हणाले की, महायुतीत निवडणूक लढवण्याचे आमचे प्रयत्न होते, मात्र परिस्थितीनुसार विविध ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे आमच्याच दोन नेत्यांमध्ये भांडणं लागत आहेत. ही भांडणं करु नका, दोन डिसेंबरपर्यंत भांडू नका, असे त्यांना म्हणायचे असेल. त्यांचा म्हणायचा अर्थ वेगळा होता. सध्या जी टीका टिपण्णी सुरु आहे, काही मतदारसंघांमध्ये टोकाचे वाद चालू आहेत, त्यामुळे ते तसं बोलले असतील, असं गिरीश महाजन म्हणाले.




