2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या विधानाने खळबळ

* राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता
मुंबई/27 नोव्हेंबर – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. तिकीट मिळावे म्हणून अनेक स्थानिक नेते आपल्या सोयीच्या पक्षात उडी मारताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले होते. हा वाद मिटतो तोवर आता पुन्हा एकदा कोकणात राणे बंधुंमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बुधवारी (26 नोव्हेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मालवणला भेट दिली. त्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. तसेच, रविंद्र चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एक धक्कादायक विधान केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे गुरुवारी (27 नोव्हेंबर) जळगावच्या दौर्यावर होते. जळगावध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत. त्यांच्या याच दौर्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना पण, रविंद्र चव्हाण यांनी सूचक विधान केले. मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन असे थेट विधान त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, निलेश राणेंनी केलेले आरोप हे खोटे असल्याचे विधान केले आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मालवणमध्ये भेट दिली. मात्र, या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश राणे यांनी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी त्यांना बेहिशोबी 25 लाख रुपये सापडले. यानंतर निलेश राणे म्हणाले की, बुधवारपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादीच देईन. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार आहे, असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी केले होते. मी गेले कित्येक दिवस सांगत होतो की, रविंद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात, तेव्हा वेगळे वातावरण निर्माण होतो. ते काल जिल्ह्यात आले. मला थोडा संशय आला की हे असेच सहज आलेले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.




