एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ‘ती’ योजना बंद होणार नाही

शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा

मुंबई /13 ऑक्टोबर : ‘‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षांत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2025-26 मध्ये हे अभियान राबविण्यासाठी 86.63 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. सन 2025-26 या वर्षाकरिता अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून यावर्षीही अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना काही काळ थांबलेली होती, परंतु शासनाने सुधारित निकषांसह हे अभियान पुन्हा राबविण्याचे ठरविले. यंदा सुधारित निकषांसह टप्पा-3 अभियान राबविण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्याकडे पाठवण्यात आला असून तो 29 ऑगस्ट 2025 रोजी शासनास प्राप्त झाला आहे. शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 30 नोव्हेंबर 2023 च्या निर्णयान्वये 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, तर 95 टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. 2024-25 मध्ये टप्पा-2 अभियान काही नवउपक्रमांसह 29 जुलै 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आले, ज्यासाठी पारितोषिकाची 73.82 कोटींची रक्कम 18 नोव्हेंबर 2024 व 9 जानेवारी 2025 रोजी वितरित करण्यात आली. 2025-26 साठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button