स्थानिक निवडणुकांसाठी ठाकरे गटाची मोर्चेबांधणी
उद्धव ठाकरेंची पदाधिकार्यांसोबत बैठक

-आघाडी, युतीबाबत घेतला आढावा
-जिल्हा व संपर्क प्रमुखांची उपस्थिती
मुंबई / 20 जून: शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन दणक्यात साजरा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (20 जून) पक्षाचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते. काही कारणाने युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून स्वबळावर लढण्यास तयार राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासंदर्भात महिन्याभरात अहवाल सादर करण्यास उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवसेना भवन’ येथे राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी स्थानिक निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. मनसेशी युती करण्यासंदर्भात आपण सकारात्मक आहोत. त्याबद्दलची भूमिका आपण जाहीरपणे स्पष्ट केली आहे. पण तुम्ही स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घ्या. आपली ताकद, स्थानिक गणिते पाहता युती, आघाडी काय श्रेयस्कर ठरेल, याची माहिती पुढील एक महिन्यात द्या. त्यानंतर स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याचे कळते.
-बोगस मतदार शोधण्याच्या सूचना
निवडणुकीतील मतदार याद्यांचा अभ्यास करा. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले? कुठे वाढले? याची माहिती घेतानाच बोगस मतदार शोधा. गटप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासावे. मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी पदाधिकार्यांना केल्याचे समजते.




