सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
सरकारकडून 5 लाखांचे आर्थिक सहाय्य

नाशिक/7 डिसेंबर – नाशिकमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सप्तश्रृंगी गडावरील गणपती पॉईंटजवळ एक इनोव्हा कार थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे भाविक गडावर देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घराकडे परतत होते. मात्र, घाटातून उतरत असताना गणपती पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. कारचा वेग किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियंत्रण सुटलेली ही कार रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडून थेट हजारो फूट खोल दरीत कोसळली. दरी अत्यंत खोल असल्याने आणि गाडी वेगाने खाली आदळल्याने हा अपघात भीषण स्वरूपाचा ठरला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, गाडी ज्या ठिकाणी पडली आहे, ती दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मदतकार्य पोहोचवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घाटातील अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवीचे दर्शन घेऊन परतणार्या भाविकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




