उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटीलांना आनंदाश्रू

मराठा समाजाचा विजयोत्सव

-आझाद मैदान गहिवरले
-प्रकृती नाजूक, संभाजीनगरला रवाना
मुंबई / 2 सप्टेंबर : राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरु केलेले आमरण उपोषण अखेर आज संपले. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले असून, त्यानुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे समितीने मान्य केले.
उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईत न थांबता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. अ‍ॅम्बुलन्समधून त्यांना पाठवले गेले असून, त्यांच्यासोबत डॉक्टर विनोद चावरे देखील आहेत. डॉक्टरांच्या मते, उपोषणामुळे जरांगे पाटील प्रचंड थकले आहेत आणि त्यांची तब्बेत नाजूक आहे. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत आणि प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. या क्षणाचे साक्षीदार झालेल्या आझाद मैदानात एकच जल्लोष घडला. विजयाची झलक पाहताना जरांगे पाटीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला, त्यानंतर मैदानावर गणपतीची आरती पार पडली आणि बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा बांधवांनी गुलाल उधळून आरक्षण आंदोलनाचा विजयोत्सव साजरा केला. उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचे कल्याण झाले. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण आहे. याआधी विदर्भ व खानदेशात त्यांनी आपले नोंदी दिल्या होत्या.
सरकारने जरांगे पाटीलांच्या मागण्यांचा स्वीकार करत शासन निर्णय जारी केला असून, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटीलांनी मुंबईत आलेल्या सर्व आंदोलकांना शांततेत गावाकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button