संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते
धनंजय मुंडेंनी केली सीबीआय चौकशीची मागणी

* मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा
बीड /7 नोव्हेंबर – माझ्यावर जर त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप असेल तर या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. माझे ब्रेन मॅपिंग करा आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार त्यांच्या सहकार्यांनी जालना पोलीस अधिक्षकांकडे बुधवारी रात्री केली. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोन संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेण्यात आलेला एक आरोपी मनोज जरांगे यांचा जुना सहकारी असल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला गेला असल्याचा आरोप करत जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. यानंतर जरांगे यांनी माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येचा कट रचल्याचे जरांगे म्हणाले. या आरोपाने खळबळ उडाली. या गंभीर आरोपानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लागलीच परळी येथे पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, कट रचणारे, कटाबद्दल बोलणारे आणि अटक झालेले हे सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते असल्याचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.जरांगे यांनी केलेला अडीच कोटी रुपयांच्या हत्येच्या सुपारीचा आरोप, भाऊबीजेला भेट, कटासाठी जुनी गाडी देण्याचे आश्वासन हे सर्व आरोप हस्यास्पद आणि निरर्थक असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. हे सर्व आरोप खोटे आणि निरर्थक आहेत. या कटाचे सत्य बाहेर आलेच पाहिजे. त्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असंही धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितलं.
धनंजय मुंडे म्हणाले की, समाजासमाजात अंतर निर्माण करण्याचे प्रयत्न अंतरवाली सराटीतून होत आहेत. मनोज जरांगे टीव्ही चॅनेलला मुलाखती देताना ऑन एअर मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि इतर नेत्यांना शिवीगाळ करतात, त्यांच्यावर कधी साधी एनसी देखील दाखल होत नाही. आम्हाला तर आया-बहिणींवरुन शिव्या दिल्या जातात. आमच्या आया-बहिणी यांच्या शिव्या खाण्यासाठीच आहेत का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी केला.




