पावसाळी अधिवेशनासाठी सुलभा खोडके तालिका सभाध्यक्ष

मुंबई / 30 जून: राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2025 ला आज सोमवार पासून सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालविण्यासाठी पीठासीन सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून सुलभा संजय खोडके यांचे नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील उपस्थित होते.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत: आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते. अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 8 पोट नियम 1 अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
सुलभा खोडके ह्या महाराष्ट्र विधानसभेवर तिसर्‍यांदा निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही उत्तम जाण असलेल्या जेष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे. विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात. त्या पक्षातील जेष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते. त्यानुसार अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत त्या अधिवेशनाचे कामकाज सांभाळणार आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button