राज्यावरील कर्जाचा बोजा 9.32 लाख कोटींवर

अर्थव्यवस्थेत 7.9 टक्के वाढ अपेक्षित

* दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानी
* आर्थिक पाहणी अहवाल सादर

मुंबई/5 मार्च – राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती 7.9 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ड.आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला.
आर्थिक पाहणी अहवालानुसार 2025-26 मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 51,00,597 कोटी रुपये इतके अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 28,82,699 कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याचे दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपये इतके अपेक्षित असून ते अखिल भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या (2,19,575 रुपये) तुलनेत लक्षणीय अधिक आहे.
देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा-पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2024-25 मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14 टक्के असून तो देशातील सर्वाधिक आहे. राज्यात रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सन 2025-26 मध्ये विविध क्षेत्रांत वाढ अपेक्षित आहे. यामध्ये कृषी व संलग्न कार्ये यात 3.4 टक्के वाढ अपेक्षित आहे तर उद्योग क्षेत्रात 5.7 टक्के आणि सेवा क्षेत्रात 9.0 टक्के वाढ अपेक्षित असून सेवा क्षेत्रातील वेगवान वाढ राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देत असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रामीण भागातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक 401.8 तर नागरी भागातील 376.7 होता. या कालावधीत ग्रामीण भागात 2.0 टक्के आणि नागरी भागात 1.5 टक्के चलनवाढ नोंदविण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतींवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील स्थिती-2025 च्या मान्सूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा 109.1 टक्के पाऊस पडला. खरीप हंगामात 157.27 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तृणधान्ये, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 116.40 लाख शेतक-यांना 94.82 लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 9,022.38 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. सौर कृषी पंप योजनेंतर्गत माहे डिसेंबर 2025 अखेर राज्यात 7.37 लाख सौर पंप बसविण्यात आले आहेत.
उद्योग आणि गुंतवणुकीत आघाडी-‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 63.85 लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून त्यातून 2.52 कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.
पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ-भारत पर्यटन डेटा कंपेंडियमनुसार 2024 मध्ये परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिसेंबर 2025 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button