ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागला

15 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर प्रवाश्यांच्या खिशावर भार

* महामंडळाकडून  भाडेवाढीचा निर्णय

मुंबई  / 30 सप्टेंबर : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एन् सनासुदीत एसटीचे प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीसह इतर सण साजरे करण्यासाठी एसटीने प्रवास करणार्‍यांना अधिक पैसा मोजावा लागणार आहे. एसटी महामंडळाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दिवाळी गर्दीच्या हंगामात परिवर्तनशील भाडे आकारण्याबाबत सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना आदेश दिले गेले आहेत. यापूर्वी २५ जानेवारी २०२५ पासून डिझेल, चेसीस, टायर यासारख्या घटकांच्या किंमती वाढल्यामुळे आणि महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार भाडेवाढ केली गेली होती. परंतु आता दिवाळी हंगामात भाडेवाढीमुळे प्रवासाचा बेत रचलेल्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे. नवीन भाडेवाढ १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान लागू राहणार असून, त्यानंतर पुन्हा दर कमी होणार असल्याचा एसटी महामंडळाचा दावा आहे. नवीन परिपत्रकानुसार १५ ऑक्टोंबरपासून साधी (साधी मिडी), जलद, निमआराम, साधी शयनआसनी, साधी शयनयान, वातानुकुलीत शिवशाही (आसनी) आणि वातानुकुलीत जनशिवनेरी (आसनी)च्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यानुसार साधी (साधी मिडी)चे भाडे प्रति टप्पा १०.०५ रुपयांऐवजी १२ रुपये, लहान मुलांचे भाडे प्रति टप्पा ७ रुपये असेल. जलद बसचे भाडे १०.०५ रुपयांऐवजी १२ रुपये, मुलांचे भाडे ७ रुपये राहील. निमआरामचे भाडे १३.६५ रुपयांऐवजी १५ रुपये, मुलांचे भाडे ९ रुपये, साधी शयनयानचे भाडे १४.७५ रुपयांऐवजी १७ रुपये, मुलांचे भाडे ९ रुपये असेल. वातानुकुलीत शिवशाही (आसनी)चे भाडे १४.२० रुपयांऐवजी १७ रुपये तर वातानुकुलीत जनशिवनेरी (आसनी)चे भाडे १४.९० रुपयांऐवजी १८ रुपये केले जातील, असे महामंडळाने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button