गुरुकुंज मोझरीत भरधाव ट्रकची कारला धडक

ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत

-डॉ. सुरेश गोदाळे थोडक्यात बचावले
तिवसा / 23 जून : गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर सोमवारी दुपारी 4.20 वाजता एक भीषण अपघात घडला. रामकृष्ण हरी मंदिर दासटेकडीकडून राष्ट्रीय महामार्गाकडे भरधाव वेगाने येणार्या ट्रक क्रमांक एमएच-04 ईएल 8171 ने सुझुकी बोलेनो कार क्रमांक एमएच 27 बीझेड 8560 ला मागून जोरदार धडक दिली. ही बोलेनो कार डॉ. सुरेश गोदाळे (श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय) यांची असून, ते काम आटोपल्यावर अमरावतीकडे जात होते. महाविद्यालयापासून काही अंतरावर हा अपघात घडला. मागून येणार्या ट्रकच्या वेगाची जाणीव होताच डॉक्टरांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र तरीही ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागील भागाचा अक्षरशः चुराडा झाला तर ट्रक थेट रस्त्याच्या खाली उतरला.
अपघातानंतर परिसरातील नागरिक, महाविद्यालयाचे कर्मचारी व प्राध्यापक घटनास्थळी धावले. डॉक्टर गोदाळे सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. ट्रकचालकाला खाली उतरवले असता तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ तिवसा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. प्रारंभी सामोपचाराचा प्रयत्न झाला. मात्र, गाडीचे मोठे नुकसान लक्षात घेता डॉ. गोदाळे यांनी तक्रार दाखल केली. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी ट्रक व चालक ताब्यात घेतले आहे.
गुरुकुंज मोझरी ते चांदूर बाजार रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून दासटेकडी परिसरात अनेक वेळा अपघात घडले आहेत. आयुर्वेद महाविद्यालय आणि आयटीआय याच मार्गावर असल्याने विद्यार्थी, कर्मचार्यांची वर्दळही मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक बसवावेत, जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल आणि अपघात टाळता येतील, अशी मागणी सा. बा. विभागाकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button