सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार
मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्वास

* 5,757 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
नाशिक /13 नोव्हेंबर : ‘नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताचे स्थान अधिक दृढ करणारा सोहळा ठरेल. राज्य सरकार नियोजनबद्ध आणि दर्जेदार तयारीसाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या प्रचारासाठी ‘डिजिटल कुंभ’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे. याअंतर्गत सर्व माहिती डिजिटल माध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 5,757 कोटी 89 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या सिंहस्थ कुंभमेळ्यात 1400 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. येथे देशभरातून येणार्या साधुसंतांसाठी सर्व सोयीसुविधांसह निवास व्यवस्था केली जाईल. घरगुती उपकरणेनाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लक्षात घेऊन शासनाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि साधुसंतांसाठी निवास व्यवस्था यांसह विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. एकूण 5,757 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये रस्ते, पूल, जलनिस्सारण, स्मार्ट सिटी प्रकल्प, वाहतूक सुधारणा, स्वच्छता योजना आणि नदी पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मंगेश चव्हाण, दिलीप बोरसे, राहुल ढिकले, तसेच वरिष्ठ अधिकारी शेखर सिंह, मनीषा खत्री, आयुष प्रसाद, दत्तात्रय कराळे, संदीप कर्णिक, भास्कर पाटील आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाशिकचा चेहरामोहरा बदलविण्याची मोठी संधी कुंभमेळ्यामुळे मिळाली आहे. या विकासकामांमुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक होईल. रामकुंड व गोदावरी नदी परिसरात स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येईल. हा त्रिखंडी कुंभमेळा 22 महिन्यांचा असेल. लाखो भाविक व साधुसंतांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने योजनेसह तयारी करणे आवश्यक आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाचा उपयोग आपण करणार आहोत. गर्दी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. आज गोदाकाठी विकासाची गंगा अवतरली आहे.




