भाजपा पदाधिकार्याच्या घरावर शिवसेना आ. निलेश राणेंची धाड
मालवणमध्ये पैसे वाटप

* निवडणूक अधिकारी, पोलीसही घटनास्थळावर दाखल
* तळकोकणात राजकीय वातावरण तापलं
मुंबई/26 नोव्हेंबर – सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वातावरण आहे. येत्या मंगळवारी 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर बुधवारी 3 डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. त्यामुळे सगळीकडे सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने प्रचाराला लागले आहेत. पण अशात तळकोकणात राजकीय वातावरण अधिक तापलंय. मुस्लिम मतदार, खोटे जात प्रमाणपत्राच्या आरोपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे.
निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत त्यांनी पैसे वाटपाचे छडयंत्र रचल्याचा दावा केला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या घरावर निलेश राणेंनी धाड टाकली. या धाडेत घरात पैसे आढळले आहेत. भाजपच्या पदाधिकार्यावर पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करण्यात आलाय. निलेश राणे यांनी याचा लाईव्ह व्हिडीओ तयार करत हे स्टिंग ऑपरेनश केलंय. यावेळी त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकार्यांना सुद्धा बोलावलं होतं. निलेश राणे यांनी यापूर्वीच निवडणुकीत पैशांच्या गैरवापराची शक्यता वर्तवली होती. तसंच त्यांनी ’पैशांचं वाटप आहे, ते सुद्धा होऊ शकतं’ असा आरोप केला होता. या धाडीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत. मालवणमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने या घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र हे आरोप भाजपने फेटाळले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमक काय समोर येत याची उत्सुकता आता तळकोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळाला लागली आहे. दरम्यान सिंधुदुर्गच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार सुरु केलाय. भाजपच्या सर्व उमेदवारांनी खासदार नारायण राणेंची भेट घेतीलये. नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडेंसह नगरसेवकपदाच्या 17 उमेदवारांनी ही भेट घेतलीय. यावेळी नारायण राणेंनी उमेदवारांना मार्गदर्शन केलंय.




