शिंदे-फडणवीस वाद अन बच्चू कडूंचं बोटांवरचं राजकीय गणित
म्हणाले भाजपाला राज्याऐवजी केंद्रात संख्याबळाची गरज

छ. संभाजीनगर/ 25 ऑगस्ट : महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. नगररचना विभागाच्या कामावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील नाराजी व्यक्त केली की काय, असा प्रश्न माध्यमांमधून पुढे सरसावला. आणि यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नेहमीप्रमाणेच थेट आणि स्पष्ट भाषेत सगळं गणित उघड केलं.
आजच्या परिस्थितीत भाजपाला महाराष्ट्रात संख्याबळाची गरज नाही. खरी गरज आहे ती केंद्रात. कारण महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांकडे लोकसभेचं वजन आहे, हे महत्वाचं ठरतं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद मोठी आहे. उद्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू केंद्र सरकारमधून बाहेर पडले, तर नवी समीकरणं तयार करण्याची ताकद या दोघांकडे आहे. त्यामुळे, राज्यात कोण कोणाशी मोकळं-नाकेदार आहे, यापेक्षा दिल्लीला टिकवणं हे भाजपाचं मोठं राजकारण असल्याचा इशारा कडूंनी दिला.
दरम्यान, कर्जमाफीच्या आश्वासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचालींबद्दल विचारलं असता बच्चू कडू पुन्हा त्यांच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये बोलले. कर्जमाफीसाठी अजित दादांनी खरी दादागिरी दाखवावी लागेल. ते आम्हाला ’दादा’ म्हणतो, पण कधी कधी आम्हालाच शंका येते. दादा समोर आणखी ‘दादा’ जोडायचं की इतर काही? कारण विधानसभेत जे आश्वासन दिलं, त्याची अंमलबजावणी आजतागायत दिसत नाही! या खोचक टोमण्यामुळे सभेत उपस्थित लोकांच्या चेहर्यावर हसू आलं, पण संदेश मात्र धारदार होता. बच्चू कडू हे सरळ बोलणारे, किंबहुना धाडसानं बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या थेट विधानांमुळे शिंदे-फडणवीसांमधील नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्हं उपस्थित झाली आहेत. आता शेतकर्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरतं आणि भाजपाचं केंद्र-राज्य गणित कसं खेळतं, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत.




