पळवून नेवून अल्पवयीन युवतीचे लैंगिक शोषण
गर्भधारणा झाल्यानंतर गुन्हा दाखल

धारणी / 22 जून: एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. नंतर सतत आठ महिने आरोपीने या मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यातून गर्भधारणा होवून बाळांतपणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, बिंग फुटले आणि आशा वर्करच्या तक्रारीवरुन आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारणी तालुक्यात ही घटना घडली आहे.
अनिल रतीलाल जांभेकर (21, रा. जुटपाणी, ता. धारणी) असे आरोपीचे नाव आहे. पिडितेचे वय 17 वर्ष 8 महिने एवढे आहे. आरोपी अनिल जांभेकर आणि पिडितेचा आपसात परिचय होता. सुमारे एक वर्षापूर्वी 1 जुलै 2024 रोजी अनिलने या अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेले. नंतर दोघे सोबत राहत होते. अनिलने युवतीशी शारीरिक संबंध स्थापित केले. त्यानंतर त्याने सतत या युवतीचे लैंगिक शोषण केले. त्यातून युवतीला गर्भधारणा झाली. दोन दिवसांपूर्वी अनिल पिडितेला प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात घेउन गेला होता. यावेळी तेथील आशा वर्करने पिडितेची कागदपत्रे तपासली असता ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.
आशा वर्करने याबाबत धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पिडित युवतीची चौकशी करुन बयाण नोंदविले. त्यातून संपूर्ण घटनाक्रम समोर आला. धारणी पोलिसांनी आरोपी अनिल जांभेकरवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पिडित युवतीला सिकलसेल आजार झाल्याने बाळंतपणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले.




