काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर/12 डिसेंबर –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून ते प्रकृतीच्या तक्रारींनी त्रस्त होते.
आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर मागील काही वर्षांत त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेल्या पाटील यांच्या निधनाने राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेल्या शिवराज पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. 1967 ते 1969 या कालावधीत लातूर नगरपालिकेत काम करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1980 साली ते प्रथमच लातूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले आणि यानंतर तब्बल सात वेळा सलग विजय मिळवत त्यांनी संसदेमध्ये एक सक्षम आणि प्रभावी नेता म्हणून स्थान निर्माण केले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश अशा अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1991 ते 1996 दरम्यान देशाचे 10 वे लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, कामकाजाचे थेट प्रक्षेपण आणि नवे ग्रंथालय या उपक्रमांना त्यांनी गती दिली. आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधीही त्यांनी अनेक वेळा मिळवली. काँग्रेस पक्षात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जाहीरनामा समितीसह विविध जबाबदार्या पार पाडल्या. 2004 मध्ये निवडणूक न जिंकता देखील त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. नंतर 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते.




