संजय शिरसाटांचा 5 हजार कोटींचा सिडको जमीन घोटाळा
रोहित पवारांचा आरोप, राजीनाम्याची मागणी

मुंबई / 18 ऑगस्ट : सिडकोचे अध्यक्ष असताना मंत्री संजय शिरसाट यांनी 5 हजार कोटींच्या जमिनीचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. शिरसाट यांना तातडीने पदावरून हटवले नाही, तर येत्या20 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीचा मोर्चा सिडको मुख्यालयावर धडकणार, असा इशारा पवारांनी दिला. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सिडकोचा जमीन घोटाळा उघड करताना सांगितले की, शिरसाट यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच बिवलकर कुटुंबाला 61 हेक्टर जमिनीतून तब्बल साडे 12 हेक्टर विकसित जमीन देण्याचा निर्णय घेतला. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल 5 हजार कोटींवर आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरसाट यांना घरी बसवण्याचा निर्णय झाला पाहिजे, अन्यथा आम्ही 20 तारखेला थेट सिडकोवर धडक देऊ, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला. ब्रिटिश काळात मराठा साम्राज्याच्या विरोधात मदत केल्याबद्दल बिवलकर कुटुंबाला रोहा, पनवेल, उरण व अलिबाग तालुक्यातील 15 गावे व चार हजार एकर जमीन इनाम स्वरूपात मिळाली होती. नंतर सरकारच्या विविध कायद्यांनुसार ती जमीन सरकारजमा झाली. मात्र, न्यायालयीन लढाईत राज्य सरकार व सिडकोने ठोस बाजू मांडली नाही. परिणामी न्यायालयाचा निकाल बिवलकरांच्या बाजूने गेला. सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली असली, तरी त्याचा उपयोग शिरसाट यांनी बिवलकरांना थेट जमीन देण्यासाठी केला, असा पवारांचा आरोप आहे. शिरसाट यांच्या घरी सापडलेली पैशांची बॅग, त्र्यंबकेेशरजवळ घेतलेली जमीन आणि एमआयडीसीमधील भूखंड हे सारे धागे या सिडको जमिनीशी जोडलेले आहेत. गरीब व स्थानिक भूमिपुत्रांना घरे मिळण्याऐवजी, मराठा साम्राज्याच्या विरोधात काम केलेल्या कुटुंबाला जमीन देणे म्हणजे भूमिपुत्रांशी सरळसरळ गद्दारी आहे, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. या बेकायदा जमिनी परत सरकारने तातडीने जप्त कराव्यात. अन्यथा आंदोलन उभे राहील, अशी मागणी करत पवारांनी जाहीर केले की 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी सिडको कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. स्थानिक नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.




