शेतकर्यांना विदेश दौर्यासाठी 2 लाख रुपये अनुदान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

मुंबई /15 ऑक्टोबर : कृषी विभागामार्फत शेतकर्यांसाठी परदेशी अभ्यास दौरे आयोजित केले जातात, ज्यामध्ये शेतकर्यांना जगातील नवनवीन सर्वोत्तम शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. या परदेश दौऱ्याच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतला आहे. 2012 नंतर प्रवास, निवास आणि परकीय चलनात वाढ झाल्यामुळे अनुदानाची मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितले की, शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. शेतकर्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी अभ्यास दौरे आयोजित केले जातात. या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, राज्य सरकारने प्रति शेतकर्याला दिल्या जाणार्या अनुदानाची कमाल मर्यादा वाढवली आहे.
राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत परदेशात जाऊन अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशांतील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पीक उत्पादन व्यवस्थापन आणि कृषी प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करतात. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणार्या शेतकर्यांच्या प्रवास खर्चाचा 50 टक्के किंवा कमाल रु. 2 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकर्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव मिळेल आणि प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबविण्याची प्रेरणा मिळणार आहे.




