पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांसाठी ‘पुनरुज्जीवन आराखडा’ हवा
पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन नसावे

* शरद पवारांची सरकारकडे मागणी
मुंबई /28 सप्टेंबर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असून, यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या उभ्या पिकांसह मातीही वाहून गेली असून जनावरे दगावली आहेत, तर घरात पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत आणि ती पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे ओशासनने सांगितले आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला पाच महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली असून राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली असून शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने आपत्ती निवारणाची तातडीने महत्त्वपूर्ण कामे हाती घ्यावीत. अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य असते आणि पंचनाम्यांवर आधारित नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानीची दखल घेतली जात नाही; अशा नुकसानाचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी. त्यांनी नमूद केले की, आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशतः दिलासा असतो, त्यामुळे शेतकरी व सामान्य जनता कोलमडून गेल्यामुळे नुकसान भरपाईसोबत पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा. यात फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत, पूर ओसरल्यानंतर तातडीने अंमलबजावणी, नागरीकांचे संसारपयोगी साहित्य, शालेय साहित्य, चारा, शेती व व्यवसायिक साधनांचा पुरवठा यांचा समावेश असावा. तसेच, पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकर्यांना विमा लाभ मिळेल आणि खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ किंवा विलंब होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.




