महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देणार
महसूल सेवकांच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ओशासन

* मंत्रालयात मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक
मुंबई /16 ऑक्टोबर – महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी, अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे, त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे ओशासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्र बावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडविताना त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे ओशासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतनश्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला. त्याबरोबरच ज्यांना पाच वर्षांचा महसूल सेवकाचा अनुभव आहे, त्यांना 25 गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. याबाबत अधिकार्यांनीही सकारात्मकता दर्शविली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. महसूल सेवकांच्या इतर प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ओशासन महसूलमंत्र्यांनी बैठकीवेळी दिले. महसूल सेवकांना यापूर्वीच मानधन वाढ देण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रश्नांना सरकार कायम प्राधान्य देते. सध्या ऑनलाईन पद्धतीने सर्व सेवा देण्यात येत असल्याने महसूल सेवकांचे बरेच काम कमी झाले आहे. पूरस्थितीच्या काळात अनेक महसूलसेवक संपावर होते, त्यामुळे अधिकार्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याचाही महसूल सेवकांनी विचार करायला हवा, अशीही चर्चा बैठकीवेळी झाली.




