महाराष्ट्र पोलीस दलात 15000 जागांची भरती
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी

* रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये 20 रुपये वाढ
*मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय
मुंबई /12 ऑगस्ट : महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रतीक्षा असलेल्या पोलीस भरती संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 15 हजार पोलीस भरती करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस विभागात भरती होण्याची इच्छा असणार्यांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठी संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मेगा पोलीस भरतीची चर्चा राज्यामध्ये सुरू होती. पण आज अखेर मंगळवारी (ता. 12 ऑगस्ट) झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमुळे सकाळपासून राजकीयवर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे अनुपस्थित राहिले आहेत. शिंदे गटाचे प्रमुख आणि अन्य दोन मंत्री अनुपस्थितीत असताना सुद्धा या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील पहिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय पोलीस भरतीसंदर्भातील आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात जवळपास सात हजारांची पोलीस भरती करण्यात आली होती. पण त्यानंतर 15 हजारांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. ज्यानंतर आता या निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून राज्यात लवकरच तरुणांना पोलीस भरतीची परीक्षा देता येणार आहे. त्याशिवाय, अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्या आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधा पत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. विमानचालन विभागा अंतर्गत सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महामंडळांमार्फत राबविण्यात येणार्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.




