अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार
दुष्कृत्याआधी आई-वडिलांना गोळ्या देवून झोपविले

अमरावती / 25 जून: एका 27 वर्षीय नराधमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले. तिला आई, वडिल व भावाला झोपेच्या गोळ्या देण्यास सांगितले आणि नंतर एका शेतात नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना चांदुर बाजार तालुक्यातील एका गावात घडली आहे. अजय जगनराव घोम असे आरोपीचे नाव आहे. अजयसह त्याला या दुष्कृत्यात सहकार्य करणार्या अनिकेत जगदेव नवले याच्यावर चांदुर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पिडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अजय घोम याची फिर्यादीच्या 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती. त्याने पिडितेला भूलथापा देवून आपल्या जाळ्यात ओढले. अजय घोमचा मित्र अनिकेत नवले हा 22 जून रोजी रात्री पिडितेकडे आला. त्याने पिडितेला झोपेच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या तुझ्या आई, वडिल आणि भावाला दे असे अजय याने सांगितल्याचे त्याने पिडितेला सांगितले. तो रात्री भेटायला येणार असल्याचेही तो म्हणाला व निघून गेला. पिडितेनेही त्याचे ऐकुण घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या.
रात्री कुटुंबिय झोपी गेल्यानंतर अजय घोम तेथे आला. त्याने पिडितेला घरामागील एका शेतात नेले आणि तेथे त्याने पिडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. यावेळी त्याने वाच्यता केल्यास जिवे मारण्याची आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. दरम्यान इकडे युवतीच्या आई-वडिलांना जाग आली. त्यांनी युवतीचा शोध सुरु केला. हे लक्षात येताच अजय घोम युवतीला घेउन दुचाकीवरुन पसार झाला. रात्री दोन वाजता त्याने लाखनवाडी येथे युवतीला उतरविले आणि थोड्या वेळात परत येतो सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही.
युवतीने कसेबसे आपले गाव गाठले आणि घरी गेली. तिने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पिडितेच्या आईने चांदूर बाजार पोलिस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अजय घोम आणि अनिकेत नवले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.




