राज ठाकरेंनी बार उडवला, आव्वाज संसदेत घुमणार

हिंदी भाषेचा अधिवेशनात गाजणार

-खा. अरविंद सावंत यांनी दिले संकेत
मुंबई / 20 जुलै : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषेचा मुद्दा गाजत आहे. प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा प्रचंड तापवला आहे. दोन दिवसांपूर्वी थेट मिरा-भाईंदरमध्ये जाऊन सभा घेत त्यांनी तापलेल्या मुद्द्याला आणखी हवा दिली आहे. हा विषय आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरात गाजतोय. देशभरातील नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. दक्षिणेतील बहुतेक नेते ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. तर उत्तरेकडील राज्यांमधून जोरदार विरोध होतोय.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे हा मुद्दा निश्चितपणे गाजणार, हे स्पष्ट झाले आहे. तसे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही दिले आहेत. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्रिभाषा सुत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याची माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे भाषेचा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याचे स्पष्टच आहे.
भाषेवरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात राज्यसभेच्या खासदारकीची माळ पडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता. मराठीतून बोलू की हिंदीतून असे, पंतप्रधानांनी आपल्याला विचारल्याची माहिती निकम यांनीच दिली होती. मोदींचे हे संभाषण म्हणजेच ‘लोहा गरम है, मार दो हतोडा’ या उक्तीला साजेशे असेच होते. त्यांनी थेट भाषावादावरून अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लक्ष्य केले. त्यामुळे आगामी अधिवेशन पंतप्रधान मोदीही या वादावर आपली भूमिका सडतोडपणे मांडणार, यात काही दुमत नाही.
राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय बार उडवून दिला आहे. अमराठी लोकांनीही मराठी शिकावी, असा त्यांचा आग्रह आहे. आपला हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून सक्तीला विरोध आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण मराठी भाषेविषयी गरळ ओकल्यास त्यांना धडा शिकविण्याबाबतही त्यांनी ठणकावले आहे. ठाकरेंच्या या घणाघाताने उत्तर भारतात कानठळ्या बसविणारा आवाज झाला आहे. हा आव्वाज थेट संसतेदही घुमेल.
मुळचे बिहारमधील आणि सध्या झारखंडमधून खासदार असलेले निशिकांत दुबे हे भाजपचे अभ्यासू नेते मानले जातात. संसदेमध्ये नियमांचे पुस्तक हातात घेऊन त्याचे दाखल देत ते विरोधकांची अनेकदा बोलती बंद करतात. त्यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जणू मोहिमच हाती घेतली आहे. ते सातत्याने काही ना काही विधाने करत ठाकरेंना डिवचण्याचे काम करत आहेत. संसदेतही हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात होणार्‍या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करू शकतात. राज ठाकरे यांचा एकही खासदार संसदेत नाही. मात्र, त्यांचे चुलत बंधून उद्धव ठाकरेंची शिलेदार राज ठाकरेंची ढाल बनून संसदेत प्रत्युत्तर देण्यास सज्ज असतील. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही साथ देतील, हे निश्चित.

संबंधित बातम्या

Back to top button