राज्यात 1 जून ते 11 ऑगस्टपर्यंत पावसाची तूट
हवामान विभागाची आकडेवारी

मुंबई /11 ऑगस्ट : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जूनपासून 11 ऑगस्टपर्यंत सर्व भागांमध्ये पावसाची तूट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात पावसाची र्सवाधिक तूट आहे. कोकण, विदर्भ भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात सरासरी 9 टक्के पावसाची तूट आहे. यंदा मोसमी पाऊस राज्यात लवकर दाखल झाला असला तरी, जुलै महिन्यात घेतलेली मोठी विश्रांती तसेच ऑगस्ट महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस पावसाची उघडीप असून राज्यात पावसाची तूट आहे. कोकणात 1 जून ते 11 ऑगस्ट या कालावधीत 2092 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा येथे 1869.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच 11 टक्के पावसाची तूट आहे. विदर्भ येथे 604.5 मिमी पाऊस पडतो. यंदा 569.1 मिमी पाऊस पडला आहे. येथे 6 टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात 475 मिमी पाऊस पडतो. येथे आत्तापर्यंत 452 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच येथे 5 टक्के पावसाची तूट आहे. त्यानंतर सर्वाधिक पावसाची तूट मराठवाड्यात आहे. तेथे 1 जून ते 11 ऑगस्ट 369.3 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, येथे 286.5 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच मराठवाड्यात 22 टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, तालुकानिहाय आकडेवारीनुसार, 1 जून ते 11 ऑगस्टपर्यंत नाशिक येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, सातारा, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, लातूर, गडचिरोली आणि जालना या तालुक्यांमध्ये पावसाची सर्वाधिक तूट नोंदली गेली आहे. इतर तालुक्यांमध्ये सामान्य पावसाची नोंद आहे.




