परतवाड्याच्या मुगलाईपुरा परिसरात दूषित पाण्याचा पूरवठा

पाईपलाईन फुटल्याने समस्या, नागरिक हैराण

-संसर्गजन्य आजार वाढण्याची भीती
अचलपूर /24 जून: परतवाडा शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील मुगलाई पुरा भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात लेखी तक्रार दाखल करत त्वरित पाईप लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
परिसरातील नागरिकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, येथे अनेक ठिकाणी पाईप लाईन गळती झाल्यामुळे गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. परिणामी पिण्याचे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि आरोग्यास घातक स्वरूपाचे झाले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये उलट्या, जुलाब, ताप, मळमळ अशा संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले असून, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्रस्त आहेत. नागरिकांनी यापूर्वीही तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप केला आहे.
मंगळवारी स्थानिक नागरिकांच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे येथे सध्या दूषित पाणीपुरवठा होत असून, पाईप लाईन गळतीमुळे नागरिकांना पाण्याऐवजी विष मिळत आहे. त्यामुळे तात्काळ या भागातील पाईप लाईन दुरुस्त करावी. या भागातील सामाजिक कार्यकर्ते, महिलावर्ग आणि वयोवृद्धांनी एकत्र येत पालिकेकडे ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. तसेच, जर पाणीपरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button