पीएसआय परीक्षेत टॉपर अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू

खेड : तालुक्यातील पाळू गावच्या शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय 30) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार्या अश्विनीकडे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते. 28 ऑगस्ट रोजी सकाळी अभ्यासात मग्न असताना अंघोळीसाठी पाणी तापवत असताना हिटरच्या अपघातामुळे अंगावर उकळते पाणी सांडले. तिच्या 80 टक्के जखमी अवस्थेत तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अखेर आज (दि. 8) अश्विनीनं मृत्यूशी झुंज देताना अखेरचा श्वास घेतला. हलाखीच्या पार्श्वभूमीतून आलेल्या अश्विनीनं मेहनत, जिद्द आणि प्रेरणेच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.




