पर्यावरणाचे रक्षण करा

कार्तिकी वारीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

पंढरपूर /2 नोव्हेंबर : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब पूजा केली. पंढरपूर विठ्ठल रकुमाईच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत आवाहन केलं आहे. त्यानुसार, पर्यावरण संवर्धन हा वारकरी परंपरेचा आत्मा असून प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, वाढवणे आणि जपणे ही जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विकासाचे वारकरी व्हा, विनाशाचे मारेकरी नका, असं म्हटल. तसंच, सध्या हवामान बदलामुळे राज्यात अनियमित पर्जन्यमान होत असल्याचे नमूद करत, मेपासून नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस ही निसर्गातील गंभीर असंतुलनाची लक्षणे आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. वारीत लाखो वारकरी सहभागी होतात, त्यामुळे या वारीतूनच समाजाला निसर्ग रक्षणाचा संदेश द्यावा, असे आवाहन करत त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, नद्यांचे प्रदूषण निर्मूलन, जलसंधारण, बीच क्लिनिंग आणि डीप क्लिन ड्राईव्ह या उपक्रमांना गती देण्यात येणार आहे. राज्यात 1 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ग्रामीण व शहरी भागात अर्बन फॉरेस्ट मॉडेल उभारले जाणार आहे. मुलांपासून पर्यावरण शिक्षणाची कास धरणार आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
पंढरपूर येथील विठोबा मंदिरात आज पहाटे शासकीय महापूजेचा भव्य समारंभ पार पडला. कार्तिक एकादशीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या महापूजेची शासकीय विधीवत पूजेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती. महापूजेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठोबा मंदिरात दाखल होऊन पंढरपूरच्या पवित्र स्थळावर विठोबा व रुक्मिणीची पूजा केली. त्याचबरोबर, यंदाच्या शासकीय महापूजेसाठी विशेष मानाचा वारकरी होण्याचा सन्मान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांची पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना देण्यात आला. या दाम्पत्याने गेल्या 20 वर्षांपासून वारंवार वारी केली असून, त्यांना शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी होण्याचा सन्मान मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
वालेगावकर दाम्पत्यने कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, पंढरंगाच्या कृपेने आम्हाला हे मोठे भाग्य प्राप्त झाले. आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी होण्याचा संधी मिळाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या दाम्पत्याला एक वर्षाचा एस.टी. बस पास भेट म्हणून दिला. महापूजेच्या समारंभानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या समृद्धीसाठी विठोबाकडे साकडे घातले. आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रांत देशात नंबर एक होण्याचे स्वप्न पाहिले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.आता, पंढरपूरमधील रस्त्यांच्या खड्ड्यांची समस्या देखील लक्षात घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 5 कोटी रुपये तातडीने दिल्याची घोषणा केली. याशिवाय, पंढरपूरच्या मंदिर समितीला पर्यटक निवासाची जागा 30 वर्षांसाठी करार वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button